गोंदवले येथे घरी जावून नाभिकांची ग्राहकांची सेवा
गोंदवले / वार्ताहर
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भावामुळे ग्रामीण भागात हजामतीसाठी घरी येणाऱ्या नाभीकांच्या सेवेची आता पुनरावृत्ती होऊ लागली आहे.यानिमित्ताने घरोघरी जुन्या आठवणींना उजाळा मिळत असला तरी एसी तील सलून बघणाऱ्या सध्याच्या पिढीपुढे मात्र या प्रसंगाने 'असं कुठं असतंय व्हय' असाच प्रश्न निर्माण होत आहे.
ग्रामीण भागात पूर्वी बलुतेदार पद्धत असायची.गावातील लोकांना आवश्यक त्या सेवा,वस्तू या बारा बलुतेदारांकडून अगदी घरपोच पूरवल्या जायच्या.त्या बदल्यात लोकांकडून धन,धान्य दिले जाई.आजही काही भागात ही पद्धत अगदी दुर्मिळ स्वरूपात सुरू असल्याचे पाहायला मिळते.पूर्वी नाभिक समाजाचे कारागीर घरोघरी जाऊन हजामत करायचे.काही ठिकाणी गावातील पारावर उघड्यावरच केसकर्तनाचे काम सुरू असल्याचे.मात्र कालानुरूप यामध्ये बदल होत गेले.आणि ही पारावरची दुकाने खेड्यात देखील एसी मध्ये बदलली.हजामतीसाठी आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर वाढला.परंतु सध्या सुरू असलेल्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हीच एसीची दुकाने लॉकडाऊन झाली आहेत.त्यामुळे लोकांची गैरसोय होत असल्याचे पाहायला मिळत आहे.गेल्या दहा दिवसांपासून केशकर्तनालय बंद असल्याने आता लोकांना नाभिकाना घरी बोलवूनच केस,दाढी करावी लागत आहे.गोंदवले व परिसरात नाभिक समाजाकडून आता घरी जाऊन हजामतीची सेवा केली जात आहे.मात्र तोंडाला मास्क लावूनच ही सेवा केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे.
---------------